Wednesday, October 16, 2019

कर्माचे फळ


एक शेठजी अत्यंत दयाळू होते. त्यांच्याकडे पैसे मागायलेल्या कुठल्याही व्यक्तीला ते पैसे देत असे भले तो परत करणार किंवा नाही शेठजी फक्त त्याला एवढेच विचारायचे तू पैसे या जन्मात परत करणार आहेस कि पुढच्या जन्मात ज्यांची पैसे परत करायची नियत नव्हती ते पुढच्या जन्मात सांगून मोकळे व्हायचे एकदा एक चोर शेठजींकडे पैसे मागण्यासाठी पोहोचला. शेठजीने त्यालाही तोच प्रश्न विचारला, पैसे परत कधी देणार या जन्मात की पुढच्या? चोर म्हणाला पुढील जन्मात. शेठजीने पैसे काढून त्याला दिले. शेठजीच्या तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे चोराने पाहिले. चोराने शेठजीच्या घरी चोरी करण्याची योजना आखली.

रात्री सर्वजण झोपल्यानंतर चोर शेठजीच्या घरात घुसला. चोर गायीच्या  गोठ्यात उभा राहून योग्य वेळेचे वाट पाहत होता, तेवढ्यात त्याच्या कानावर दोन्ही गायीचे बोलणे पडले. दोन गायी एकमेकींशी बोलत होत्या. एका गायीने दुसऱ्या गायीला विचारले तू आजच येथे आलीस का? दुसऱ्या गायीने उत्तर दिले हो, मी मागील जन्मात शेठजींकडून पैसे घेतले होते आणि ते आता फेडण्यासाठी आले आहे. तू केव्हापासून येथे आहेस? पहिल्या गायीने उत्तर दिले मला येथे पाच वर्ष झाले आहेत. मी शेठजींकडून कर्ज घेतले होते आणि पुढील जन्मात परत देईल असे सांगितले होते. शेठजींकडून कर्ज घेतल्यानंतर माझा मृत्यू झाला आणि मी गाय बनून येथे आले. आता दूध देऊन कर्ज फेडत आहे. जोपर्यंत कर्जाचे पूर्ण पैसे जमा होत नाहीत, मला येथेच राहावे लागेल. चोर दोन्ही गायीचे बोलणे ऐकून चकित झाला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याच्या लक्षात आले की, कर्ज घेतल्यानंतर ते फेडावेच लागते मग ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. दुसऱ्या दिवशी चोराने शेठजीचे पैसे परत केले आणि चोरी करणेही सोडून दिले.

तात्पर्य: कधीच इतरांचे वाईट करू नये आणि असे करण्याचा विचारही करू नये.

No comments:

Post a Comment