Sunday, September 29, 2019

यशोविजय पंडित

आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्‍यात प्रकांड पंडित होऊन गेला. तो अनेक विषयांत निपुण होता. त्‍याच्‍या बाबतीत असे सांगण्‍यात येते की एकदा त्‍याला पंडीतांमार्फत एक विषय देण्‍यात आला होता. त्‍या विषयानुसार तो संस्‍कृतमध्‍ये बोलत राहिला. मात्र हळूहळू त्‍याला आपल्‍या पांडित्‍याचा गर्व होऊ लागला. व्‍याख्‍यानाच्‍यावेळी त्‍याच्‍या सांगण्‍यावरून त्‍याचे शिष्‍य चारही बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्‍ये त्‍याचे नाव झाले आहे.

विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन अन्‍य शिष्‍यांना योग्‍य वाटत नव्‍हते. पण त्‍याला विचारण्‍याचे कोणीच धाडस करत नव्‍हते. एकेदिवशी एका शिष्‍याने त्‍याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्‍य धन्‍य आहे, मी मोठा भाग्‍यवान आहे की आपल्‍यासारख्‍या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्‍या सत्‍संगाचा लाभ झाला. एक प्रश्‍न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्‍हणाले,''मी तर त्‍या दोघांपुढे काहीच नाही. त्‍यांच्‍या चरणाच्‍या धुळीइतकेसुद्धा मला ज्ञान नाही'' शिष्‍य म्‍हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्‍यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्‍याचे हृदय अहंकाररहित झाले.

तात्‍पर्य: अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते. 

No comments:

Post a Comment